मुंबई: न्यायप्रविष्ठ प्रकरणांमुळे लांबणीवर पडलेल्या राज्यातील २४ नगरपालिका तसेच विविध ७६ नगरपालिकांमधील १५४ सदस्यांसाठी उद्या, शनिवारी मतदान होणार आहे. यामध्ये बारामती, अंबरनाथ अशा मोठ्या नगरपालिकांचा समावेश आहे. दरम्यान २ डिसेंबरला मतदान झालेल्या २६४ नगरपालिका व नगरपंचायती तसेच उद्या मतदान होणार्या २४ नगरपालिकांची मतमोजणी रविवारी होणार आहे. मतमोजणीची सारी तयारी राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी राज्यातील तब्बल २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायती अशा २८८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्ष आणि ६ हजार ४२ सदस्यपदांच्या जागांसाठी निवडणूक जाहीर केली होती. या सर्व जागांसाठी १ डिसेंबरला मतदान होणार होते. मात्र निवडणूक अर्जाच्या छाननीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकार्यांनी देलेल्या निर्णयाविरोधात काही उमेदवांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतल्याने आणि न्यायालयाने त्यावर तीन दिवसांच्या मुदतीत निकाल न दिल्याने मतदानास काही तास शिल्लक असतानाच २४ नगरपालिका अध्यक्षपदांच्या आणि विविध ठिकाणच्या १५४ सदस्यपदाच्या जागांवरील निवडणुकांची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने लांबणीवर टाकली होती.
लांबणीवर पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत विरोधकांची फारशी ताकद दिसली नसली तरी सत्ताधारी भाजप आणि शिवसेना(शिंदे ) यांनी मात्र ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. पहिल्या टप्यातील प्रचारानंतर गेल्या दोन- दिन दिवसात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा या नगरपालिकांमध्ये प्रचारसभा घेत मतदारांना साद घातली. त्यामुळे मतदारांचा कल कोणाला मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२४ पालिकांमध्ये उद्या शनिवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५,३० या वेळेत मतदान होईल. ज्या ठिकाणी मतदान होणार आहे नगरपालिका पुढीलप्रमाणे: ठाणे- अंबरनाथ. अहिल्यानगर- कोपरगाव, देवळालीप्रवरा, पाथर्डी व नेवासा. पुणे- बारामती व फुरसुंगी- उरुळी देवाची. सोलापूर- अनगर व मंगळवेढा. सातारा- महाबळेश्वर व फलटण. छत्रपती संभाजीनगर- फुलंब्री. नांदेड- मुखेड व धर्माबाद. लातूर- निलंगा व रेणापूर. हिंगोली- बसमत. अमरावती- अनंजनगाव सूर्जी. अकोला- बाळापूर. यवतमाळ- यवतमाळ. वाशीम- वाशीम. बुलढाणा- देऊळगावराजा. वर्धा- देवळी. चंद्रपूर- घुग्घूस.
अनेक ठिकाणी गोंधळाचे वृत्त
या मतदनादरम्यान दरम्यान, नांदेडमधील धर्माबाद येथील एक घटना समोर आलेली आहे. नांदेडच्या धर्माबादमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप मतदारांकडूनच करण्यात येत आहे.
आज धर्माबाद पालिकेसाठी मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया सुरू असताना शहरातील इराणी मंगल कार्यालय येथे मतदारांना बोलवून मतदान करू नका, असे भाजपाने सांगितल्याचा आरोप होतोय. घटनास्थळी तत्काळ पोलीस दाखल झाले. पण तिथे कोणताही वादविवाद होताना दिसून आला नाही. जे मतदान भाजपाला होणार नाही अशा मतदारांना प्रलोभन दाखवून मतदान करू नका अशी विनंती भाजपा करत होते अशी चर्चा सध्या सुरु आहे.
अहिल्यानगरमधील कोपरगावमध्येही गोंधळ
अहिल्यानगरमधील कोपरगाव येथील मतदान केंद्रावर देखील गोंधळ झाल्याचं समोर आले आहे. यावेळी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली असून मतदारांवर उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा आरोप दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. आरोप करत असताना उपस्थित असणार्या पोलिसांसमोरच दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना मतदान केंद्रापासून दूर नेले. यानंतर मतदार प्रतिनिधी आणि पोलिसांध्येही शाब्दिक चकमक झाल्याचं समोर आले. या सगळ्या प्रकारामुळे कोपरगावमधील एस. जी. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर काहीकाळ तणावाचे वातावरण होते.
भुसावळमध्येही मतदान केंद्रावर पोलीस व निवडणूक केंद्रावरील कर्मचार्यांमध्ये शाब्दिक चकमक
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील प्रभाग क्रमांक ११ ब मधील अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील मतदान केंद्रावर पोलीस व निवडणूक केंद्रावरील कर्मचार्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. निवडणूक केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले वाहन कर्मचारी सतत ने आण करत असल्यामुळे पोलिसांनी कर्मचार्यांना अडवल्याने कर्मचारी व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. स्ट्राँगरूममधून ईव्हीएम मशीन व मतदान केंद्रावरील साहित्य तसेच मतदान केंद्रावरील अधिकार्यांना केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी खाजगी वाहन देण्यात आले आहे. त्यावर मतदान केंद्रावरील परवानगी पत्र देखील लावण्यात आले आहे. मात्र मतदान सुरू झाल्यानंतर सदर वाहन कर्मचारी मतदान केंद्रातून काही साहित्य आणण्यासाठी ने आण करत असल्याने पोलिसांनी कर्मचार्यांना अडवत मतदान केंद्रावरच सदर वाहन लावण्याच्या सूचना केल्याने काही काळ गोंधळ उडाला.